मराठी पत्रकार दिन: विसरलेला वारसा आणि चैतन्य गुरुकुलाची प्रेरणादायी पुढाकार
शाळांमध्ये दर्पण दिन साजरा होण्याची गरज; लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला सन्मान देण्याची अपेक्षा

चिखली (जि. बुलढाणा), ७ जानेवारी : महाराष्ट्रात दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले, त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून महाराष्ट्र शासनाने हा दिवस अधिकृतपणे “मराठी पत्रकार दिन” म्हणून घोषित केला आहे. मात्र, राज्यातील बहुतांश शाळा-महाविद्यालयांमध्ये या दिवसाचा विसर पडलेला दिसतो, ही खेदजनक बाब आहे.
अशा पार्श्वभूमीवर चिखली (जि. बुलढाणा) येथील चैतन्य गुरुकुल विद्यालयाने वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर बातमी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिताना विद्यार्थ्यांनी निरीक्षणशक्ती, लेखनकौशल्य आणि पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांची ओळख करून घेतली.
शाळेचे मुख्याध्यापक विलास श्रीतापे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम शाळेत नियमितपणे आयोजित केले जातात. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि पत्रकारितेच्या महत्त्वाची जाणीव होईल.” शिक्षकांनीही हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

मराठी पत्रकारितेचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. ‘दर्पण’ने केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती करून लोकांना संघटित केले. सतीप्रथा, बालविवाह, जातीयवाद अशा सामाजिक कुरीतींविरोधात आवाज उठवला. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जाणारी पत्रकारिता आजही समाजाला दिशा दाखवते. मात्र, शासनाने हा दिवस अधिकृत साजरा करण्याचा निर्णय घेतला असतानाही, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, तहसील कार्यालये किंवा सहकारी संस्थांमध्ये याचा उत्साह दिसत नाही. शाळांमध्येही स्नेहसंमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम जोरात असताना दर्पण दिनाकडे दुर्लक्ष होते.
एकेकाळी शाळांमध्ये पत्रलेखन, सुंदरलेखन, कविता, कथा, बातमी लेखन अशा स्पर्धा दिनविशेषानिमित्त नियमित होत्या. त्यातून विद्यार्थ्यांना भाषा, संस्कृती आणि सामाजिक जाणिवा मिळत होत्या. आज मराठी भाषेच्या शिक्षण आणि व्यावसायिक वापरासाठी ओरड होत असताना, या वारश्याकडे पाठ फिरवणे चिंताजनक आहे.
चैतन्य गुरुकुलसारख्या संस्थांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन सर्व शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये आणि सहकारी क्षेत्रात मराठी पत्रकार दिन अनिवार्यपणे साजरा करण्याबाबत पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठी भाषेचा मान अबाधित राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. दर्पण दिन साजरा करणे म्हणजे केवळ एक औपचारिकता नव्हे, तर आपल्या मातीची नाळ जपणे आहे.



