खामगाव–जालना रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी दिला ठाम विश्वास..
रेल्वे लोक आंदोलन समिती सोबत ना. जाधव व आ. श्वेता महाले यांनी रेल्वेमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले निवेदन…

चिखली : तब्बल ११५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव – जालना या रेल्वेमार्गाच्या विषयाने आता गती घेतली आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री आयुष्यमंत्री व जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे संसद भवनात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीमध्ये झालेल्या चर्चेअंती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी खामगाव – जालना रेल्वेमार्गाच्या विषयाला अनुकूलता दर्शवत लवकरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला मांडणार असल्याचे ठोस आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
विदर्भ आणि मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची क्षमता असलेला खामगाव – जालना रेल्वेमार्ग स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित आहे. रेल्वे लोकआंदोलन समिती या मार्गासाठी गेल्या १७ वर्षांपासून लढा देत आहे. आजवर संवैधानिक मार्गाने समितीने या विषयाकडे राज्य व केंद्र शासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले. त्याचाच परिपाक म्हणून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्यात यश आले आहे. दि. १६ डिसेंबर रोजी संसद भवान येथे जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात ही भेट झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दालनात खामगाव – जालना रेल्वेमार्गाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये आ. श्वेता महाले यांनी हा रेल्वेमार्ग होणे कसे गरजेचे आहे ते प्रभावीपणे मांडले तसेच ना. प्रतापराव जाधव यांनी खामगाव – जालना रेल्वेमार्गासमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला कशाप्रकारे गती मिळेल यावर प्रकाश टाकला. रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने हा हा ररेल्वमार्ग कलकत्ता – मुंबई या व्यस्त रेल्वेमार्गावरील अतिरिक्त वाहतूक वळवण्यास सक्षम पर्याय ठरू शकतो या महत्त्वाच्या मुद्द्याकडे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. हा मुद्दा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील मान्य केला. या चर्चेदरम्यान रेल्वे मंत्र्यांनी खामगाव – जालना रेल्वेमार्गाबद्दल आपली अनुकूलता दर्शवत लवकरच सदर रेल्वेमार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे ठोस आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या भेटीदरम्यान रेल्वे आमदार श्वेता महाले तसेच रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने डॉ. किशोर वळसे आणि रेणुकादास मुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना या रेल्वेमार्गाच्या मंजुरीची विनंती करणारी निवेदने व आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली. यावेळी डॉ आशुतोष गुप्ता, गोपाल तुपकर, माजी नगरसेवक शेख अनिस हे उपस्थित होते.



