माजी मंत्री भारत भाऊ बोन्द्रे यांचे दुःखद निधन

- ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी कैबिनेट मंत्री भारत भाऊ बोन्द्रे यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्प आजाराने मंगळवारी दुःखद निधन..
- चिखली मतदारसंघाचे १९७२ पासून तब्बल २२ वर्षे आमदार ..
- उद्योग, शिक्षण आणि पाटबंधारे खात्याचे तीन वेळा कैबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली..
- जिल्ह्यात जलपुरुष म्हणून ओळखले जाते.
- खडकपूर्णा प्रकल्प, पेनटाकळी प्रकल्प आणि जिगाव प्रकल्प यांसारखे जलसंपदा उपक्रम यशस्वीरीत्या राबवले.
- त्यांचे अंत्यसंस्कार आज सायंकाळी पाच वाजता चिखली येथे होणार आहे..
चिखली (बुलढाणा), ३ डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्याचे ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी कैबिनेट मंत्री भारत भाऊ बोन्द्रे यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्प आजाराने मंगळवारी दुःखद निधन झाले. चिखली मतदारसंघाचे १९७२ पासून तब्बल २२ वर्षे आमदार राहिलेले बोन्द्रे हे उद्योग, शिक्षण आणि पाटबंधारे खात्याचे तीन वेळा कैबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या निधनाने चिखलीतील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, जिल्हाभर शोकलहरी उसळत आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे अंत्यसंस्कार आज सायंकाळी पाच वाजता चिखली येथे होणार आहे.

भारत भाऊ बोन्द्रे यांचा राजकीय वारसा वंशपरंपरागत होता. त्यांचे वडील स्व. राजाभाऊ बोन्द्रे हे चिखली नगरपरिषदेचे २९ वर्षे अध्यक्ष म्हणून सेवारत होते, ज्यांनी स्थानिक विकासात मोलाचे योगदान दिले. भारत भाऊंना सात भाऊ आणि दोन बहिणी होत्या. आमदारकीच्या काळात त्यांनी लोकांच्या न्यायासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. या वारशाला त्यांनी यशस्वीरित्या पुढे नेले.
पाटबंधारे खात्याच्या मंत्रीपदावेळी बोन्द्रे यांनी खडकपूर्णा प्रकल्प, पेनटाकळी प्रकल्प आणि जिगाव प्रकल्प यांसारखे जलसंपदा उपक्रम यशस्वीरीत्या राबवले. या प्रकल्पांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील पाण्याच्या दीर्घकाळच्या समस्येवर भेदभावमुक्त उपाययोजना झाल्या, ज्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळाला आणि या कारणास्तव त्यांना जिल्ह्यात जलपुरुष म्हणून ओळखले जाते. तर उद्योग खात्यात स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देत अर्थव्यवस्थेला चालना दिली, तर शिक्षण खात्यात शालेय सुविधा वाढवल्या. शेवटच्या क्षणापर्यंत पाणी व्यवस्थापनासाठी चिंतित असलेले बोन्द्रे हे संयमी, प्रेमळ, अभ्यासू आणि न्यायप्रिय स्वभावासाठी ओळखले जाणारे आणि सर्वांसोबत सलोख्याचे संबंध ठेवणारे ते नेते होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि नातवंडांसह मोठा परिवार आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला असून, विविध नेत्यांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. चिखलीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांमधून स्मृतींना उजाळा देत शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो आणि कुटुंबियांना शोक सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना सर्वत्र होत आहे.




