Blogमनोरंजन

धर्मेंद्र : पडद्यामागचा सच्चा माणूस, पडद्यावरचा अमर नायक

“ही-मॅन ऑफ बॉलीवुड” म्हणून प्रसिद्ध

     हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नायक आले, चमकले आणि लोप पावले, पण काही चेहरे असे आहेत जे काळाच्या ओघातही फिके पडत नाहीत. त्यांपैकी एक नाव म्हणजे धर्मेंद्र. “ही-मॅन ऑफ बॉलीवुड” म्हणून प्रसिद्ध झालेला हा कलाकार केवळ पडद्यावरील नायकच नाही, तर माणूस म्हणूनही एक हृदयस्पर्शी व्यक्तिमत्त्व आहे. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये झाला. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील छोट्या खेड्यात जन्मलेला धर्मसिंह देओल म्हणजेच आपला धर्मेंद्र, यांचे बालपण साध्या कुटुंबात गेले. त्यांचे वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसील रायकोट जवळील डांगो आहे. त्यांच्या मनात मोठं स्वप्न होतं, चित्रपटसृष्टीत नायक होण्याचं ‘फिल्मफेअर टैलेंट हंट’ मधून त्यांना मुंबई गाठायची संधी मिळाली आणि तिथून सुरू झाली अभिनयाची सुरुवात, एका स्वप्नाची कहाणी आणि एक अविस्मरणीय प्रवास.
     १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून पदार्पण झाले आणि पुढे धर्मेंद्रने मागे वळून पाहिले नाही आणि ‘नायक ते सुपरस्टार’ असा यशस्वी प्रवास त्यांनी गाठला. १९८० च्या दशकात धर्मेंद्रने केलेले शोले, सीता और गीता, चुपके चुपके, अनपढ़, सत्यकाम, बंदिनी, हकीकत, यादों की बारात, धरमवीर, ड्रीम गर्ल, राम और श्याम असे अनेक चित्रपट आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या डोळ्यांतील प्रेमळ चमक, खळखळून हसणारा चेहरा आणि न्यायासाठी लढणारा प्रामाणिक माणूस हा त्यांच्या अभिनयाचा गाभा होता.

“वीरू” म्हणून तो लोकांच्या हृदयात कायमचा घर करून बसला. धर्मेंद्र यांची खरी ओळख म्हणजे त्यांचं साधेपण आणि माणुसकी. गावाकडच्या भाषेत बोलणारा हा अभिनेता लाखो चाहत्यांच्या गर्दीतही ‘आपला माणूस’ म्हणून ओळखला जातो.
त्यांच्या मुलगा सनी आणि बॉबी देओलसह त्यांनी जपलेले कौटुंबिक मूल्य आजच्या चमकदार दुनियेतही आदर्श ठरतात. जमिनीशी जोडलेला हा माणूस, आजही आपल्या शेतात काम करतो, झाडं लावतो आणि निसर्गाशी संवाद साधतो, हेच त्यांचं खरे तेज आहे. ‘सत्यकाम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेला सत्यनिष्ठ अभियंता असो वा ‘शोले’तील हसरा वीरू, प्रत्येक भूमिकेतून धर्मेंद्रने भारतीय समाजातील भावनिक ताण-तणाव आणि आशा-आकांक्षा जिवंत केल्या. त्यांच्या अभिनयात एक माणूस दिसतो, रडणारा, हसणारा, प्रेम करणारा, संघर्ष करणारा पडद्यापलीकडचा नायक, संवेदनशील मनाचा कलाकार आणि पडद्यावरचा वीरू आणि जीवनातला सच्चा वीर.” धर्मेंद्र!
धर्मेंद्र वयाच्या नवव्या दशकात असुनही त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तीच कोमलता, तेच स्मित आहे. त्यांचे ट्वीट्स, त्यांचे आठवणींनी भरलेले व्हिडिओ, अजूनही चाहत्यांना जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकवतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी ओल आहे, जणू पडद्याच्या झगमगाटापलिकडे असलेली आत्मीयता. काळ गेला पण धर्मेंद्र कायम राहिला. धर्मेंद्र हे फक्त अभिनेता नाहीत तर ते एक भावना आहेत. त्यांच्या संवादांमध्ये जसे प्रेम आहे, तसेच त्यांच्या जीवनात आहे करुणा. त्यांचा प्रवास म्हणजे मेहनतीचा, प्रामाणिकतेचा आणि माणुसकीचा विजय. आजच्या नव्या पिढीला धर्मेंद्रकडून शिकण्यासारखे खूप काही आहे की, नायक होण्यासाठी पडद्यावर लढणं पुरेसं नाही, जीवनातही माणुसकीने जगणं गरजेचं असतं.
ते एक कुशल अभिनेते, चित्रपट निर्माता आणि राजकारणी आहेत, त्यांनी लोकसभा मतदारसंघ असलेल्या बिकानेर येथून खासदार म्हणून काम केले आणि १५ व्या लोकसभेचे सदस्य होते. २०१२ मध्ये या ज्येष्ठ अभिनेत्याला भारत सरकारने पद्मभूषण, तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रिय सुपरस्टारपैकी एक आहेत, त्यांनी ३०० हून अधिक चित्रपट इंडस्ट्रीला दिले आणि या वयातही ते अभिनयात सक्रिय राहिले.

प्रवीण बागडे
नागपूर
मो.क्र. ९९२३६२०९१९
————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button