चिखली

भाजपचा विकासाचा संकल्प; काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर श्वेता महाले यांचा हल्लाबोल

काँग्रेसच्या कारभारावर सडकून टीका..

Story Highlights
  • भ्रष्टाचाराला समर्थन देणार नाही, भ्रष्टाचार करणाऱ्या ला बाहेरचा रस्ता दाखवला..
  • ज्यांनी भ्रष्टाचार केला कॉंग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली.
  • कॉंग्रेसच्या काळात पारित झालेल्या सारंगवाडी प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याची चौकशी विधानसभेत स्वतः मीच केली - आमदार महाले.
  • पुतळा सुशोभीकरण प्रकल्पावर काँग्रेसने अफवा पसरवून राजकारण केल्याचा आरोप..

चिखली (Buldhana) : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये झालेल्या संवाद बैठकीत आमदार श्वेता महाले यांनी जोरदार भाषण करत काँग्रेसच्या कारभारावर सडकून टीका केली आणि भाजपच्या विकासकामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला.

मंचावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख, सागर पुरोहित, दीपक काळे, माई भवर, राजेंद्र व्यास, कुसुम देशमुख, सुनील लाहोटी, सलीम परवेज, कैलास शर्मा, रेणुकादास मुळे, नज्जू भाई, किशोर दहिवाळ, विनोद सुराणा आणि निसार हाजी यांसह अनेक पदाधिकारी, आणि मोठ्या संख्येने प्रभागातील महिला व पुरुष उपस्थित होते.

श्वेता महाले म्हणाल्या, “काँग्रेसची सत्ता दिल्ली ते गल्लीपर्यंत होती, तरीही शहराचा विकास ठप्प राहिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली अनेक विकासकामे आज काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतात, पण त्यांच्या अंमलबजावणीत काँग्रेसने अडथळे निर्माण केले.

“भ्रष्टाचाराचा मुद्दा अग्रस्थानी

भाजप नेत्यांनी काँग्रेस उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सांगितले की, “भ्रष्टाचाराला आम्ही कधीही थारा दिला नाही. उलट भ्रष्ट व्यक्तींना बाहेरचा रस्ता दाखवला, पण काँग्रेस मात्र त्याच लोकांना उमेदवारी देत आहे.” चिंचेखालचा रस्ता तीन वेळा तयार होऊनही विकास ठप्प राहिल्याचे उदाहरण देत भ्रष्टाचाराला संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी लढा आणि पारदर्शक कारभार

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मोबदला विषयावर बोलताना श्वेता महाले म्हणाल्या, “२००९ पासून थांबलेला शेतकऱ्यांचा मोबदला भाजप सरकारने मिळवून दिला. विधानसभेत सातत्याने प्रयत्न करून आम्ही शेतकऱ्यांना न्याय दिला.

“तसेच शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण प्रकल्पावर काँग्रेसने अफवा पसरवून राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

ओपन स्पेसचा पारदर्शक वापर

महाले यांनी नमूद केले की, काँग्रेसच्या काळात गावातील मोक्याच्या ओपन स्पेसवर खाजगी नावे चढवली गेली, परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर १५ ते २० ओपन स्पेस पुन्हा नगरपरिषदेच्या ताब्यात घेत समाजभवनांना पारदर्शक पद्धतीने वाटप करण्यात आल्या.”प्रत्येक समाजघटकाला न्याय देणारा पक्ष म्हणजे भाजप,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे व मोठ्या सभेत शामिल होण्याचे आवाहन

बैठकीच्या शेवटी श्वेता महाले यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडितराव देशमुख, तसेच प्रभाग ७ मधील नगरसेवकपदाच्या उमेदवार सौ. विभा दीपक काळे आणि सौ. ममता शैलेश बाहेती यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. तर सदर कार्यक्रमाचे संचलन विजय तिवारी यांनी केले.

त्या म्हणाल्या, “२५ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहराच्या विकासाच्या या यज्ञात सहभागी व्हावे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button