तांत्रिक बिघाडामुळे चिखली न.प. निवडणुकीत गोंधळ: दुसऱ्या दिवशीही अर्ज ‘निरंक’!
दुसऱ्या दिवशीही अर्ज ‘निरंक’!


चिखली (Buldhana) : चिखली नगर परिषदेच्या (न.प.) सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी, निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे इच्छुक उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी, दिनांक ११/११/२०२५ पर्यंत, अध्यक्ष पदासाठी तसेच प्रभाग १ ते १४ करीता दाखल झालेल्या नामांकन अर्जांची संख्या ‘निरंक’ (शून्य) असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाकडून प्राप्त झाली .
“निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या तांत्रिक बिघाड ठरतोय मुख्य अडथळा”
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज ‘निरंक’ राहण्यामागे निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक बिघाड हे प्रमुख कारण आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी (Errors) आढळून येत आहेत. परिणामी, अर्ज भरल्यानंतर त्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे उमेदवारांनी सांगितले.
उमेदवारांशी बोलताना हे स्पष्ट झाले की, ही तांत्रिक अडचण निवडणूक आयोगाच्या प्रणालीतील आहे. वारंवार प्रयत्न करूनही अर्ज दाखल होत नसल्यामुळे अनेक इच्छुकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. अर्ज भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर दोन दिवस अर्ज दाखल न होणे, ही गंभीर बाब असून, निवडणूक आयोगाने तातडीने यात लक्ष घालून तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी इच्छूक उमेदवारांनी केली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना, तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांचे हक्काचे दिवस वाया जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.



