गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधातील लसीकरण मोहिमेत चिखलीची मार्गदर्शक वाटचाल…
आमदार श्वेता महाले यांच्या संकल्पनेला जिल्हास्तरावर मान्यता...

चिखली (बुलढाणा) : गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मोफत लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. परंतु या उपक्रमाचे मूळ बीजारोपण चिखलीत झाले आहे हे विशेष उल्लेखनीय आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मागील पाच वर्षांत या लसीचे मोफत वितरण मोठ्या प्रमाणावर करून महिलांच्या आरोग्याबाबत एक अनुकरणीय कार्य उभारले….

आमदार श्वेता महाले यांनी CSR फंडच्या माध्यमातून चिखलीतील हजारो मातांना ही लस उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आरोग्यदूताप्रमाणे काम करत त्यांनी महिलांना योग्य मार्गदर्शन, जागरूकता आणि मोफत लसीकरण देऊन संपूर्ण परिसरात आरोग्यविषयक संवेदनशीलता वाढवली.

या कामाची दखल केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही घेतली. त्यांनी आमदार श्वेता महाले यांच्या या आरोग्य उपक्रमाचे सार्वजनिक कौतुक करत, भविष्यातही अशा आरोग्यविषयक योजनांना हातभार लागेल असे आश्वासन दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे या उपक्रमाला योग्य दिशा मिळाली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेली १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम ही प्रत्यक्षात चिखलीतून सुरू झालेल्या उपक्रमाचीच जिल्हास्तरीय वाढ आहे. आमदार श्वेता महाले यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आता संपूर्ण जिल्ह्यातील मुलींना या जीवघेण्या आजारापासून संरक्षण मिळणार आहे.
या मोहिमेअंतर्गत ग्रामीण–शहरी भागातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी सुरू झालेला हा महत्त्वाचा उपक्रम—
चिखलीची संकल्पना, श्वेता महाले यांची दूरदृष्टी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन
—या तिघांच्या संगमातून जिल्हाभरात विस्तारत आहे.
ही मोहीम पुढील काळात ‘आरोग्यदायी माता—सशक्त समाज’ निर्माण करण्यात मोठा मोलाचा वाटा उचलणार आहे.



