- ओजस अढिया: चिखलीच्या मातीपासून जगाच्या संगीत स्टेजपर्यंतचा चमकदार प्रवास..
- तबल्याचा पहिला ठेका लहानपणी, गुरु मृदंगराजजींच्या शिष्यत्वाने पूर्ण झाला स्वप्न..
- बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं ओजस अढियाचा आत्मविश्वास आणि यश वाढले..
- जॉन मॅकलॉफिनच्या ‘शक्ती’ बँडसोबत इस्तंबूलमध्ये तबला वाजवण्याचा अविस्मरणीय अनुभव..
- पुढच्या दशकात तबला सिंफनीसह नवे प्रयोग, विविध संगीतात ओजस अढियाचा नवसंकल्प
चिखली (योगेश शर्मा): विदर्भाच्या खोलवर रुजलेल्या मातकडून उदयास आलेला एक साधा तरुण आज जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयात तबल्याच्या ठेक्याने धडकतो. ओजस अढिया – हे नाव भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगात एक चमकदार तारा आहे, ज्याचा प्रकाश केवळ भारतापुरता मर्यादित नाही तर अमेरिका, लंडन आणि इस्तंबूलपर्यंत पोहोचला आहे. तब्बल १७ वर्षांच्या लांब अंतरानंतर ओजस यांनी त्यांच्या जन्मगावी चिखलीत पाऊल ठेवले आणि या निमित्ताने दिलेल्या या विशेष, दिलखुलास मुलाखतीत त्यांच्या जीवनाची एक अविस्मरणीय कथा उलगडली. ही मुलाखत केवळ संगीताची नाही, तर मेहनत, त्याग, अध्यात्म, कुटुंबीयांच्या प्रेम आणि मूळशी असलेल्या अटूट बंधनाची आहे. संपादक योगेश शर्मा यांनी घेतलेल्या या संवादात ओजस यांनी बालपणाच्या गोड आठवणींना उजाळा दिला, संगीताच्या कठीण प्रवासातील संघर्ष सांगितला, प्रसिद्ध कलाकारांसोबतचे भावनिक क्षण शेअर केले आणि भविष्यातील स्वप्ने उलगडली. ही कथा प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत आहे – विशेषतः त्या युवकांसाठी जे स्वप्ने पाहतात पण मार्ग शोधतात. जणू काही वाचक या मुलाखतीत गुंतून जाईल, ओजस यांच्या तबल्याच्या ठेक्यासारखा त्याच्या जीवनाच्या लयीशी जोडला जाईल.

१७ वर्षांनंतर जन्मभूमीच्या मातकडे परतावा: “मी घरी आलो, माझ्या मातीला स्पर्श करून धन्य झालो”
प्रश्न: चिखली हे तुमचे जन्मगाव. आज तब्बल १७ वर्षांनंतर तुम्ही इथे येत आहात. इथल्या पवित्र मातकडे पाहून, पाय ठेवताच मनात सर्वप्रथम काय भावना उमटल्या? “ही माझी माती आहे” की “मी परत घरी आलो आहे”?

ओजस अढिया: चिखलीबद्दल माझे प्रेम हे शब्दांत मांडता येण्यापलीकडचे आहे – ते एक भावनिक बंधन आहे, जे मला नेहमीच ओढत राहते. मी मुंबईत व्यस्त जीवन जगत असो, भारतात विविध शहरांत कार्यक्रम देत असो की अमेरिकेत संगीताच्या लहरी पसरवत असो – माझ्या प्रत्येक बायोडाटात, प्रत्येक परिचयात मी अभिमानाने लिहितो की, “माझा जन्म चिखलीत झाला.” ही जन्मभूमी माझ्या नाळेशी जोडलेली आहे, एक अटूट धागा जो कधीच तुटत नाही, उलट अधिक मजबूत होत जातो. १७ वर्षांच्या या लांब अंतरानंतर इथे येण्याची उत्सुकता इतकी तीव्र होती की, मी दिवस गणत होतो. कुटुंबासोबत हसणे, खेळणे, आनंद साजरा करणे – हे सर्व मला इथेच शक्य वाटत होते, जणू काही मी परत घरी आलो आहे. माझे मामा, बहिणी, नातेवाईक सर्व माझ्या येण्याने एकत्र आले. हा आनंद इतका वेगळा, इतका हृदयस्पर्शी आहे की, शब्द अपुरे पडतात. चिखलीशी असलेली ही भावनिक जोड इतकी मजबूत आहे की, कुठेही असलो तरी इथली आठवण नेहमीच माझ्या हृदयात जिवंत राहते, मला प्रेरणा देत राहते.माझे आजोबा असताना दर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही दोघे भाऊ इथे यायचो. तेव्हा घरात गमती-जमती, खेळ, हास्याचे फवारे उडायचे – ते क्षण आजही मनात ताजे आहेत. ती उत्सुकता वर्षानुवर्षे कायम राहायची, आणि आता १७ वर्षांनंतर इथे येणे हे जणू काही बालपणातील स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. माझा जन्म चिखलीत का झाला, याबद्दल मी आई-बाबांना कधीच विचारले नाही. पण आई नेहमी म्हणायची, “तू चिखलीचा आहेस.” आणि इथल्या लोकांचे प्रेम? ते तर आजही मला भरभरून मिळते – एक निस्वार्थ, शुद्ध प्रेम जे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात विकत मिळत नाही, ते केवळ अनुभवता येते. आज इथे आल्यावर मी सर्वप्रथम ग्रामदैवत रेणुका मातेच्या दर्शनाला गेलो. तिथे उभे राहून वाटले की, त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहे, जणू काही एक अद्भुत चमत्कार या ठिकाणी वास करतो. रेणुका मातेच्या मूर्तीकडे बघताना मी स्वतःला धन्य मानले – मी खूप नशीबवान आहे की, माझा जन्म इथे झाला आणि तबला हा माझ्या जीवनात एक दैवी भेट म्हणून आला, ज्याने माझे जीवन बदलून टाकले.
अकोट आणि चिखलीच्या मातकडून मिळालेले अनोखे मिश्रण: “स्वभावातून संगीत उमलते, जीवन फुलते”
प्रश्न: अकोटचा बालपण आणि चिखलीची जन्मभूमी – या दोन्ही मातकडून तुमच्या तबल्याला काय वेगळेपणा मिळाला असे वाटते? हे मिश्रण तुमच्या संगीतात आणि जीवनात कसे प्रतिबिंबित होते?
ओजस अढिया: बघा, माझे बाबा अकोटचे होते – तिथला कल्चर, शिक्षण, जीवनशैली सर्व काही वेगळा, मजबूत आणि पारंपरिक होता, जणू काही एखाद्या खडकासारखा अटळ. तर आई चिखलीची – तिचे शिक्षण, संस्कार आणि जीवनदृष्टी वेगळी, अधिक साधी, हृदयस्पर्शी आणि प्रेमळ होती. हे दोन्ही मार्ग इतके मजबूत आणि पूरक होते की, माझ्या जीवनात ते एक अनोखे मिश्रण घडवून गेले, ज्याने माझी ओळख तयार झाली. लोक मला नेहमी म्हणतात, “तू बाबांसारखा आहेस – तुझ्यात तीच धडाडी आणि दृढता आहे” किंवा “तू आईसारखा आहेस – तुझ्यात तीच नम्रता आणि प्रेम आहे.” हे मिश्रण माझ्या स्वभावात उतरले आहे, आणि मी मानतो की ही त्यांची पुण्याई आहे. जे ते शिकले, अनुभवले, ते माझ्या नशिबी आले, आणि त्याने माझे जीवन समृद्ध झाले.
संगीताच्या जगात एक शाश्वत सत्य आहे – जसा तुमचा स्वभाव, तसे तुमचे संगीत. माझा स्वभाव हे मिश्रण असल्याने माझे तबल्याचे ठेकेही तसेच असतात – कधी अकोटच्या मजबूतीसारखे धडाडणारे, कठोर आणि शक्तिशाली; कधी चिखलीच्या साधेपणासारखे हृदयस्पर्शी, मऊ आणि भावपूर्ण. हे मिश्रण मला वेगळे बनवते, जणू काही दोन नद्या एकत्र येऊन एक मोठा, शक्तिशाली प्रवाह तयार होतो. या मातकडून मिळालेले हे वारसे मला नेहमीच प्रेरित करतात, आणि माझ्या संगीतात ते प्रतिबिंबित होऊन वाचक किंवा श्रोत्यांना एक वेगळी अनुभूती देतात.

चिखली सोडताना काय घेऊन जाल? “आठवणी, प्रेम आणि साधेपणाचे धडे”
प्रश्न: विदर्भाच्या अकोट आणि चिखलीच्या मातीतूनआलेला एक साधा तरुण आज जगातील सर्वाधिक मागणी असलेला तबलावादक आहे. हे अकोट आणि चिखलीवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. चिखली सोडून जाताना तुमच्यासोबत काय जाईल? फक्त आठवणी की मूठभर माती?
ओजस अढिया: आठवणी तर सोबत असणारच, पण त्यासोबत प्रेमही आहे – ते निस्वार्थ प्रेम जे इथल्या लोकांनी मला दिले आहे. आणि जे आपले मूळ आहेत, ते कधीच विसरायचे नाही, हे मंत्र माझ्या मनात नेहमीच असतो. बऱ्याच वर्षांची इच्छा होती मला चिखलीला येण्याची – एक वेगळीच ओढ लागलेली होती, जणू काही माती मला बोलावत होती. परंतु रोजची धावपळ, आंतरराष्ट्रीय टूर, कार्यक्रमांची मालिका – या व्यस्ततेत मी इथे येऊ शकलो नव्हतो. आता इथे आल्यावर मला एक अनोखा आल्हाद, शांती आणि आराम वाटतो, जणू काही मी जगाच्या चकाचौंधीपासून दूर, माझ्या मूळांकडे परतलो आहे.
बाहेरील दुनियेची चकाचौंध ही केवळ दिसण्यापुरती असते – ती तात्पुरती आणि भ्रामक. खरे जीवन हे सिम्पल आणि नॉर्मल असते, जे इथे मला भरभरून मिळते. इथल्या बहिणींच्या हातचे साधे, ऑरगॅनिक जेवण – ते स्वास्थ्यासाठी चांगले तर आहेच, पण त्यात असलेले प्रेम हे कुठेही विकत मिळत नाही. हे प्रेम, हे साधेपण आणि या आठवणी मी सोबत घेऊन जाईन, ज्या मला नेहमीच जमिनीवर ठेवतील आणि माझ्या संगीताला अधिक गहनता देतील.

लहानपणीचा पहिला स्पर्श: “ताल केहरवा आणि गुरुकृपेचा चमत्कार”
प्रश्न: तुमच्या मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये दिसले की, लहानपणी सत्संगात तबल्याचा आवाज ऐकून तुमची बोटे तबल्यावर थिरकली आणि ताल केहरवा वाजवला. सुरुवातीला सर्वांना वाटले तुम्ही खेळत आहात, पण बाबांनी तुमच्यातला गुण ओळखला. याबद्दल अधिक सांगा.
ओजस अढिया: ही एक छोटीशी पण जीवन बदलणारी गोष्ट आहे, जी मला नेहमीच प्रेरित करते. आई आणि बाबा हे आमचे आध्यात्मिक गुरु स्वामी मुक्तानंदजी आणि गुरुमाई चिद्विलासानंदजी यांच्या सत्संगात नियमित जायचे. मी फक्त सहा महिन्याचा असताना आईजवळ बसायचो आणि गुडघ्यावर रेंगाळत तबल्यापाशी जात होतो, त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचो. बाबांना सुरुवातीला वाटले, हे लहान बाळ खेळत आहे. पण सत्संगात आम्ही निरंतर जायचो, आणि जेव्हा मी दोन वर्षांचा झालो तेव्हा पहिल्यांदाच मी ताल केहरवा वाजवला. कोणीही मला शिकवले नव्हते, घरात तबल्यासारखे साधनही नव्हते. पहिल्यांदाच बोटे तबल्यावर ठेवली आणि माझ्याकडून केहरवा वाजला – हे ऐकून बाबांना वाटले, ही गुरुकृपा आहे, दैवी आशीर्वाद आहे.त्यावेळी बाबांनी माझ्यातला हा गुण ओळखला आणि ठरवले की, मी या मुलाला बेसिक तालीम देईन. जेव्हा मी चार वर्षांचा झालो, तेव्हा अकोटमध्ये पहिला कार्यक्रम केला. त्यानंतर लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये “यंगेस्ट तबला प्लेयर ऑफ इंडिया” म्हणून माझी नोंद झाली, आणि माझ्या जीवनाचा खरा प्रवास सुरू झाला. म्युझिक डायरेक्टर कल्याणजी-आनंदजी यांचे सीनियर विद्यार्थी संजीव ओंकारजी अमरावतीचे होते. कल्याणजींनी त्यांना माझ्याबद्दल सांगितले, आणि आम्ही भेटलो. मी तबला वाजवला, ते खुश झाले आणि म्हणाले, “आता कल्याणजींना भेटा.” १९९४ मध्ये बाबांसोबत मुंबईला गेलो, आणि कल्याणजींसमोर मी तब्बल चार तास तबला वाजवला. ते मन लावून ऐकत होते, आणि शेवटी म्हणाले, “तुमच्या मुलाचा भविष्य घडवायचे असेल तर मुंबईत स्थायिक व्हा.” बाबा डॉक्टर होते, अकोटमध्ये त्यांची प्रॅक्टिस चालू होती. पण माझ्यासाठी त्यांनी सर्व सोडले आणि मुंबईला आले. तिथे गुरुची गरज होती, आणि कल्याणजींचे खास मित्र पंडित मृदंगराजजी यांची भेट घडली. पाच वर्षांचा असताना त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारले, गंडाबंधन केले – हे माझ्यासाठी जीवनातील सर्वात मोठे सौभाग्य आहे.
आई-बाबांचा त्याग: “अशक्य वाटणारे पाऊल, जे माझ्यासाठी उचलले”
प्रश्न: लहानपणी आई-बाबांमुळे तुम्हाला अध्यात्म मिळाले, आणि तुमच्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी घरदार, व्यवसाय सोडून मुंबई गाठली. या त्यागाकडे तुम्ही कसे बघता?
ओजस अढिया: तेव्हा मी लहान होतो, काही कळत नव्हते. माझ्यापेक्षा एक लहान भाऊ आहे, जोही कलाकार आहे – त्याने स्टेजवर मिमिक्री सुरू केली होती. आम्हाला फक्त परफॉर्म करण्याची ओढ होती, गुरुकृपा होती. पण आता या वयात मला हकीकत कळते – आई-बाबांनी माझ्यासाठी किती मोठा त्याग केला! त्यांनी आपल्या जीवनाशी सौदा केला, स्ट्रगलचा सामना केला. अकोटमध्ये सुरू असलेली प्रॅक्टिस, घरदार – सर्व काही कोणताही विचार न करता सोडले. मुंबईला येणे हे अशक्य वाटते – कुणी सांगितले की, “तुम्ही सर्व सोडून अमेरिकेला या,” तर मी जातो का? पण आई-बाबांनी फक्त मुलाचे भविष्य उज्वल व्हावे म्हणून हे पाऊल उचलले. त्यांचा मोबदला मी कधीच देऊ शकत नाही. कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात – त्यांच्याबद्दल काहीही बोलू किंवा करू, ते कमीच आहे. हा त्याग मला नेहमीच प्रेरित करतो, जमिनीवर ठेवतो.


बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद: “एक मोठ्या व्यक्तिमत्त्वाची पाठ थोपट”
प्रश्न: बाळासाहेब ठाकरेंसमोर तुम्ही कार्यक्रम केला होता. तेव्हाचा अनुभव आणि त्यांनी तुमच्याबद्दल काय व्यक्त केले?
ओजस अढिया: मला आठवते, नेहरू सेंटर मुंबईत ‘लिटिल वंडर’चा कार्यक्रम होता. आदरणीय बाळासाहेब ठाकरे तिथे आले, आमचा कार्यक्रम ऐकला. ते इतके खुश झाले की, स्टेजवर आले आणि मला आशीर्वाद दिला. मी तेव्हा फक्त सात वर्षांचा होतो, मला जास्त कळत नव्हते – वाटले, एक VIP गेस्ट आलेत. पण त्यांनी सांगितले, “तू चांगला तबला वाजवतोस, तू खूप मोठा होशील.” आज ते दिवस आठवले की कळते, एवढे मोठे व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे प्रेरणास्थान – त्यांनी माझी पाठ थोपटली. मी खूप नशीबवान आहे, आणि हा आशीर्वाद माझ्या यशाचा पाया आहे.

अविस्मरणीय क्षण: “उस्ताद झाकीर हुसेन यांचे शब्द, जे हृदयात कोरले गेले”
प्रश्न: आजपर्यंत खूप मोठ्या कलाकारांसोबत कार्यक्रम केले. एखादा असा क्षण आठवतो का, ज्यात तुम्ही सर्व विसरून गेलात, काही नवीन मिळाले किंवा एखाद्या प्रकारची मस्ती चढली?
ओजस अढिया: २०१९ ची गोष्ट आहे – मी पहिल्यांदा आशा भोसले, उस्ताद सुजात खान यांच्यासोबत लंडनला गेलो होतो. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी बघितले की, महान तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन प्रेक्षकांमध्ये बसले आहेत. मी तबले स्टेजवर ठेवले आणि सरळ स्टेजखाली उतरून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्याजवळ फुलांचा बुके होता, तो त्यांनी मला दिला. मी म्हणालो, “हे तुमचे आहे, मी कसा घेऊ?” त्यावर ते म्हणाले, “जे माझे होते, ते आजपासून तुझे आहे.” हे शब्द ऐकून मी भावूक झालो – ते सरळ हृदयात उतरले. मी बुके घेऊन स्टेजवर गेलो आणि ५०-६० मिनिटे तबला वाजवला. झाकीरजी एकटक माझ्याकडे बघत होते, मन लावून ऐकत होते, हसत होते – जणू प्रोत्साहन देत होते. माझी भीती दूर झाली, आणि इतक्या मोठ्या कलाकारांबद्दलचा आदर अधिक वाढला. हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद होता, ज्याने मला नवीन ऊर्जा दिली.

पुढील १० वर्षे: “एक्सपिरिमेंट, नवीनता आणि संगीताची नवी उंची”
प्रश्न: पुढील १० वर्षांत ओजस अढिया स्वतःला कुठे बघतो?
ओजस अढिया: मी क्लासिकल संगीत वाजवतो, पण गुरुजींनी नेहमी सांगितले, “तबल्याला प्रोफेशन बनवायचे असेल तर फक्त क्लासिकल पुरेसे नाही – सर्व शैली शिका.” म्हणून मी क्लासिकल, सोलो, गाणे, सितार, संतूर, बासरी सोबत वाजवतो. फ्युजन कॉन्सेप्ट मी कॉलेजमध्ये (मिठीबाई) सुरू केले – इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न म्युझिकचे मिश्रण. हरिहरनजी, पंकज उदासजी, अनूप जलोटाजी यांच्यासोबत गझल वाजवणे सुरू केले. विविध शैलीत वाजवणे कठीण असते, पण ते आवश्यक आहे. माझा युट्यूबवर “तबला सिंफनी बाय ओजस अढिया” हा व्हिडिओ आहे – १६ वायोलिन, ६ विओला, ३ सेलो सोबत एक्सपिरिमेंट. चेन्नईत रेकॉर्ड केला, सात मिनिटांचा ट्रॅक. लोकांना नवीन द्या, चांगले द्या – ज्याने मन शांत होईल, आनंद होईल. हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
वैवाहिक जीवन: “मैत्री ते प्रेम – एक सुंदर योग”
प्रश्न: तुमचे सासरे पंकज उदास. हा योग कसा जुळला?
ओजस अढिया: मी २०१०-११ पासून त्यांच्यासोबत तबला वाजवतो. ते मला प्रेम आणि आशीर्वाद देतात. एकदा त्यांची मुलगी मुंबईत कार्यक्रमाला आली, आमची भेट झाली. कार्यक्रमांमुळे भेटी होत गेल्या, मैत्री झाली. तिची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – त्यातून माझे कार्यक्रम झाले. मैत्री प्रेमात बदलली, आणि आज आई-बाबांसारखा सपोर्ट मला तिच्याकडून मिळतो.

तबल्याने शिकवलेले जीवनाचे धडे: “नम्रता, मेहनत आणि समाधानाची शोध”
प्रश्न: तबल्याने तुम्हाला आयुष्याबद्दल काय शिकवले?
ओजस अढिया: खूप काही – कसे बोलावे, वागावे, ते शिकवले. कार्यक्रमानंतर घरी येताना समाधान मिळायला हवे, पण नेहमी वाटते, काही सुटले. तबल्याने शिकवले की, जमिनीवर राहा. तबला माझे सर्वस्व – तो नसता तर मी नाही. जीवन तबल्यामुळे मिळाले.युवा पिढीसाठी सल्ला आणि भविष्याच्या योजना: “गुरु, रियाज आणि अकादमीचे स्वप्न”
प्रश्न: आजची पिढी मोबाइलकडे, कल्चरकडे ओढ नाही. विदर्भातील मुलांसाठी, पालकांसाठी काही योजना?
ओजस अढिया: कार्यक्रमांत युवा वाढले – सोशल मीडियाचा फायदा. अकोटला गेलो तेव्हा मुले तबला शिकत भेटली. चांगले गुरु आवश्यक – मी भाग्यवान, कल्याणजी ते मृदंगराजजी. तालीम, रियाज सुरू. युवक चंचल, रीलसाठी मेहनत – पण लॉंग टर्म नाही. चांगले गुरु, तालीम, रियाज हवे. मी विद्यार्थी, फोकस परफॉर्मन्सवर. वयाच्या पन्नाशीनंतर अकादमी – ज्यात लोक येतील, संगीत पुढे नेतील. प्रत्येकाला आई-बाबांसारखा सपोर्ट मिळावा.
जन्मभूमीवर कार्यक्रम: “निस्वार्थ भावनेने झाला तर नक्की”
प्रश्न: चिखलीत कार्यक्रम होईल?
ओजस अढिया: आता येत राहणार. कार्यक्रम करेन, पण संगीतप्रेमी आयोजक हवेत. निस्वार्थ भावनेने झाला तर नक्की – चिखलीचा भाचा म्हणून कर्तव्य.

शेवटचे शब्द: दोन अविस्मरणीय कथा – “शक्ती”चे स्वप्न आणि वडिलांची आठवण
प्रश्न: मुलाखतीत अजून काही बोलायची इच्छा आहे का? काही सुटले असेल तर…
ओजस अढिया: हो, नक्कीच. मला एकदा खूप मोठी संधी मिळाली होती, जी आजही स्वप्नासारखी वाटते. २०१९ ची गोष्ट आहे. मी बेंगलोरला शंकर महादेवन यांच्यासोबत कार्यक्रम करत होतो. तिथे जागतिक ख्यातीचे गिटार वादक जॉन मॅकलॉफिन (John McLaughlin) उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यावर मी हुबळीला गेलो. तिथला शो संपवून परत येताना मी स्वतः गाडी ड्राईव्ह करत होतो. रस्त्यात माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला – जॉन मॅकलॉफिन यांचा!
मेसेज होता: “ऑक्टोबर २०१९ मध्ये इस्तंबूलमध्ये ‘शक्ती’चा कार्यक्रम आहे. ‘शक्ती’ हा जगप्रसिद्ध फ्युजन बँड आहे – जॉन मॅकलॉफिन स्वतः, उस्ताद झाकीर हुसेन, शंकर महादेवन, सेल्वा गणेश विनायकम् आणि व्हायोलिनचे जादूगार गणेश राजगोपालन – असे पाच दिग्गज एकत्र येतात. सध्या झाकीर हुसेन अमेरिकेच्या टूरवर आहेत. तुम्ही माझ्यासोबत बेंगलोरमध्ये जे वाजवलेत, ते ऐकून मला वाटते की तुम्ही त्यांच्या जागी तबला वाजवावा. ही माझी खास इच्छा आहे.”
तो मेसेज वाचला आणि मला खरंच धक्काच बसला. गाडी बाजूला उभी करावी लागली. मनात विचार आला – हा खरा आहे की खोटा? जॉन मॅकलॉफिन मला मेसेज करतायत? घरी पोहोचलो, कुटुंबीयांशी चर्चा केली, आणि शेवटी मी “हो” म्हणालो. ऑक्टोबर २०१९ मध्ये मी इस्तंबूलला गेलो आणि ‘शक्ती’सोबत स्टेज शेअर केला. ज्यांना मी लहानपणी कॅसेटवर ऐकत होतो, ज्यांचे पोस्टर्स मी भिंतीवर लावायचो, त्यांच्या मध्येच मी तबला वाजवत होतो! हे स्वप्न मी कधी पाहिले नव्हते, पण ते पूर्ण झाले. आजही जेव्हा आठवण येते, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. एवढ्या मोठ्या कलाकाराकडून थेट आमंत्रण मिळणे – हे माझ्यासाठी जीवनातील सर्वात मोठे सौभाग्य आहे.

प्रश्न: जीवनात प्रत्येकाची भूमिका मर्यादित असते. तुमचे वडील लवकर गेले, पण जाण्याआधी त्यांनी तुम्हाला संगीताच्या मार्गावर नक्कीच चालायला शिकवले. आज ते हयात असते तर त्यांना काय म्हणालात?
ओजस अढिया: (काही क्षण गप्प राहिले, डोळे पाणावले…) आज जर बाबा असते तर त्यांना खूप खूप आनंद झाला असता. माझा हा संपूर्ण प्रवास त्यांच्या डोळ्यांसमोरून गेला असता तर ते हसले असते, अभिमानाने डोके वर करून उभे राहिले असते. त्यांनी माझ्यासाठी जी मेहनत घेतली, जी सुरुवात करून दिली, जी स्वप्ने पाहिली – आज मी जो कोणी आहे, ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे. आजही प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात मी देवाला प्रार्थना करतो आणि त्यानंतर बाबांची आठवण करून, त्यांचेही आशीर्वाद मागतो. त्यांच्याशिवाय हे सर्व अशक्य होते. बाबा, तुम्ही जिथे आहात तिथे हसत असाल… आणि मला अभिमानाने बघत असाल, असे मला खात्रीने वाटते.
ही मुलाखत ओजस अढिया यांच्या जीवनाची एक संपूर्ण, प्रेरणादायी झलक आहे. विदर्भाच्या मातीतून जगाच्या स्टेजपर्यंतचा हा प्रवास युवकांना प्रेरित करेल, आणि वाचकांना भावनिक स्पर्श देईल. – योगेश शर्मा
(Photo Credit : Social Midea)



