खामगावमध्ये थंडीच्या तडाख्यात निराधारांना आधार
सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने ब्लँकेट वाटप

खामगाव (बुलढाणा) : शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या कडाक्याच्या थंडीने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः रस्त्यावर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि मंदिर परिसरात वास्तव्य करणाऱ्या निराधार, वृद्ध, अंध-अपंग व्यक्तींना रात्र काढणे मुश्कील झाले आहे. अशा उपेक्षितांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाने पुढाकार घेतला. मंडळाच्या वतीने २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री शहरातील विविध ठिकाणी जाऊन निराधारांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २५ वर्षांपासून “मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में” हे ध्येय घेऊन विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. सन २००० मध्ये ह.भ.प. गोपाल महाराज रेवस्कर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या मंडळाने भजनाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितांना मदत करण्याचे व्रत अखंडित ठेवले आहे.
थंडीच्या या जीवघेण्या लाटेत उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लँकेट देऊन मंडळाने माणुसकीचा आदर्श घालून दिला. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, शनि मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, सामान्य रुग्णालय आणि परिसरातील गरजूंना प्रत्यक्ष जाऊन ब्लँकेट वाटप करण्यात आले.

या उपक्रमात माजी नगरपरिषद उपाध्यक्ष दर्शनसिंग ठाकूर, ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र मावळे, गणेश जाधव, नगरसेविका रेखा जाधव, समाजसेवक महेंद्र पाठक, सुभाष शेळके, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे, अरुण कडवकर, दिलीप झापर्डे, लालाजी सांगळे, प्रमोद सुरंगे, गंगाधर पवार, पवन पाठक, सागर ठाकूर, दादा ठाकूर, स्वराज सुकाळे, विनोद देशमुख, अभय जोध, गोपाल लाड, विक्की देशमुख, विनोद ढवळे, ज्ञानेश्वर सुकाळे, यश वानखडे, पन्नालाल श्रीवास्तव, सुशिला आवलकर, संगीता वाघोळे, जयश्री झापर्डे, जया सुकाळे, शोभा ठाकूर, माया लांडगे, लता फंड, चैताली फंड, बबिता लांडगे, कविता केळोदे, जानु शर्मा, किर्ती शर्मा, अंबिका काटकर यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
मंडळ वर्षभर वृक्षारोपण, रक्तदान, गरिबांना भोजन वाटप, पक्षांना पाण्याची पात्रे वाटप असे अनेक उपक्रम राबवते. या निस्वार्थ सेवेची दखल घेत देविदास शर्मा यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
समाजातील उपेक्षितांना आधार देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे माणुसकी जिवंत राहते, असा संदेश या ब्लँकेट वाटपाने दिला आहे.
