चिखलीतील सहकार्य गणेश मंडळाला महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार

चिखली (बुलडाणा) | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ मध्ये चिखली येथील सहकार्य गणेश मंडळाने जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पटकावला आहे. पर्यावरणपूरक उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि शिस्तबद्ध उत्सव आयोजनातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा सन्मान मंडळाला प्रदान करण्यात आला.
गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सहकार्य गणेश मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त उत्सव आणि नागरिकांमध्ये पर्यावरण जागृतीचे प्रभावी उपक्रम राबवले आहेत. यासह रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून यशस्वीपणे आयोजित केले जातात. केवळ धार्मिक उत्सवापुरते मर्यादित न राहता समाजासाठी आदर्श घालून देणाऱ्या या कार्याची परीक्षक समितीने विशेष नोंद घेतली.
हा पुरस्कार बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्माननीय जिल्हाधिकारी किरणजी पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. मंडळाला ४०,००० रुपयांचा धनादेश आणि सन्मानपत्र देण्यात आले.
पुरस्कार वितरण प्रसंगी मंडळाचे सुचित भराड, श्रीकांत सोळंकी, चेतन नागवाणी, नितीन जांगिड, प्रसाद सोळंकी, आशिष गोलाणी आणि स्वप्नील पाटील उपस्थित होते. तसेच नितीन वराडे, निलेश भुसारी, प्रणव कोठारी, पंकज सोळंकी, प्रणव गाडेकर, कृष्णा नागरे, अभिषेक काकडे, गोपाल पाटील, सागर भोलाने आणि श्रेयश हरलालका यांनी या यशाचे जल्लोषात स्वागत केले.
मंडळाच्या सर्व सदस्यांनी या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करताना भविष्यात सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम अधिक जोमाने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सहकार्य गणेश मंडळाच्या या यशामुळे चिखलीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



