चिखली

चिखलीत मनसे-शिवसेना युतीचा जल्लोष

ठाकरे बंधूंच्या ऐक्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण

चिखली (बुलढाणा) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील अधिकृत युतीच्या घोषणेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह चिखली शहरातही आनंदाचे वातावरण पसरले आहे. दोन्ही ठाकरे बंधू (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) राज्याच्या हितासाठी एकत्र आल्याच्या निर्णयाचे स्वागत करत, चिखली येथील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष साजरा केला.

स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा होऊन “ठाकरे बंधूंचा विजय असो” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आणि गुलाल उधळून या ऐतिहासिक युतीचा आनंद व्यक्त करण्यात आला.

मनसे आणि शिवसेनेची ही ऐतिहासिक युती झाली असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाकरे बंधू राजकीय पटलावर एकत्र आल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून चिखलीतील मनसे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हातात हात घालून “हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ही युती काळाची गरज होती,” अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या.

त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, तालुका सचिव प्रवीण देशमुख, चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, उप तालुकाध्यक्ष संजय दळवी, उप तालुकाध्यक्ष मयूर पऱ्हाड, उपतालुकाध्यक्ष संदीप म्हस्के, मनसे विद्यार्थी सेनेचे उप तालुकाध्यक्ष अंकित इंगळे यांसह शिवसेना पक्षाचे नंदू कऱ्हाडे युवा सेना जिल्हाप्रमुख, किसन धोंडगे शिवसेना तालुकाप्रमुख, श्रीराम झोरे शिवसेना चिखली शहर प्रमुख, बी.टी म्हस्के शिवसेना तालुका समन्वयक, समाधान जाधव शिवसेना उपशहर प्रमुख, विष्णू मुरकुटे शिवसेना तालुका संघटक, सुनील रगड शिवसेना उपतालुकाप्रमुख यांसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button