चिखली

प्रतिभा छोटू कांबळे यांची अपक्ष उमेदवारी दाखल

चिखली नगरपालिकेच्या राजकारणात नव्या युवा चेहऱ्याची दमदार एन्ट्री

चिखली (Buldhana) : चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीत नव्या युवा चेहऱ्याने आज जोरदार एन्ट्री घेतली आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी प्रतिभा छोटू कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या या पावलाने स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
प्रतिभा कांबळे यांनी आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ऑफलाईन अर्जही निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला. या उमेदवारीनंतर प्रभागातील विद्यमान पक्षीय उमेदवारांच्या गणितात मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही त्यांची पहिलीच निवडणूक असली तरी सामाजिक व लोकसंपर्क क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि जनाधार लक्षात घेता, त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे.

फुले–शाहू–आंबेडकर विचारधारेतून कार्य

त्यांचे पती छोटू कांबळे हे सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी फुले–शाहू–आंबेडकर विचारधारेतून कार्य करत जनतेच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. सत्य, वास्तव आणि निडर पत्रकार म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचा लाभ प्रतिभा कांबळे यांच्या निवडणुकीस निश्चितच होईल, असे बोलले जात आहे.
अत्यंत सामान्य घरातून प्रवास सुरू करून सामाजिक जाणिवा जपत कार्यरत असलेल्या कांबळे दाम्पत्याचे कार्य स्थानिक नागरिकांत लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘नवा चेहरा, नवी उमेदवारी’ म्हणून प्रतिभा कांबळे यांची एन्ट्री चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीत नवा रंग भरताना दिसत आहे.

“मी मायबाप जनतेच्या विश्वासावर, प्रामाणिकपणावर आणि सेवाभावावर निवडणूक लढवते आहे. समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
— प्रतिभा छोटू कांबळे, अपक्ष उमेदवार, प्रभाग क्र. ३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button