पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई
८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

बुलढाणा, दि.२५ (जिमाका): जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाच्या धडक कारवाया सुरु आहेत. मलकापूर तालुक्यातील मौजा नरवेल परिसरातील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ८ टिप्पर व १६ ब्रॉस वाळू जप्त करण्यात आली असून, एकूण अंदाजे १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी ८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास केली आहे. दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास, पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर हद्दीतील नरवेल कोटेश्वर मंदिर शिवार येथे पेट्रोलिंग सुरू असताना जमुनापुरी घाटातून मलकापूरकडे शासनाचा महसूल बुडवून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांसह पंचांना सोबत घेऊन नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पदरीत्या येणारी ८ टिप्पर वाहने थांबवून तपासणी केली असता, चालकांकडे वाळू वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचे आढळून आले. पंचासमक्ष तपासणीमध्ये प्रत्येकी सुमारे २ ब्रॉस वाळू असे एकूण १६ ब्रॉस वाळू (अंदाजे किंमत २ लाख रुपये) तसेच प्रत्येकी अंदाजे २० लाख रुपये किमतीची ८ टिप्पर वाहने जप्त करण्यात आली. अशा प्रकारे वाळू व वाहनांसह १ कोटी ६२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पो.स्टे. एमआयडीसी दसरखेड भाग-०५, गुन्हा अप. क्र. १७५/२०२५ अन्वये कलम ३०३(२) भान्यासं सह कलम २१(१), २१(२) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मलकापूर येथील ६ जण, नांदुरा आणि मोताळा येथील एका जणाचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या टिप्पर वाहनांचे क्रमांक MH-28-BB-6174/ 2895/ 4414/ 4172/ 1210/ 8910/ 7935 / 7397 असे आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



