गर्दीत सोन्याची पोत चोरल्या गेली, चिखली डी.बी. पथकाच्या ताब्यात दोन बुरखाधारी महिला
आरोपी महिलांनी दिली चोरीची कबुली...

- १७ नोव्हेंबर २०२५ रोजी चिखली बसस्थानकात १५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पोत चोरीची घटना घडली.
- पोलिसांनी गर्दीचा फायदा घेणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांना २४ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत शिताफीने कारवाई केली.
- आरोपी महिलांनी चोरीची कबुली दिली, त्यांच्याकडून जुनी सोन्याची पोत आणि ब्लेडचा तुकडा जप्त करण्यात आला.
चिखली (बुलडाणा, दि. २५ नोव्हेंबर) : चिखली बसस्थानकाजवळील गर्दीतून सोन्याची पोत चोरी करणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांना चिखली पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अंमलात आणलेल्या कारवाईत जेरबंद केले आहे. १५ ग्रॅम वजनाची, ४०,००० रुपयांच्या किमतीची पोत चोरीची ही घटना १७ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली होती.
फिर्यादी सौ. द्रोपदाबाई जयराम बंगाळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्या बसमध्ये चढत असताना त्यांच्याकडून चोरी झाली. पोलीस तपासात, २४ नोव्हेंबर रोजी बसस्थानकाजवळ गर्दीच्या फायद्याने शंकास्पद हालचाली करताना दोन बुरखाधारी महिला – नसरीन बी. शेख नासेर (४२) व समीना बेगम सतार खान (४४), दोघी इंदिरा नगर, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या – यांना ताब्यात घेण्यात आले.या महिलांकडून चोरीची कबुली घेतली असून त्यांच्या घराची झडती घेत ५ ग्रॅम वजनाची जुनी सोन्याची पोत, दोन डोरले आणि मणीसह ब्लेडचा तुकडा बरामद झाला आहे.

डी.बी. पथक प्रमुख पो.नि. भुषण गांवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत सफौ राजेंद्र काळे, पोना अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावा, राहुल पायघन, रुपाली उगले, सर्यकला म्हस्के, मंगेश मोरे आणि इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते.
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या कडक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यामुळे बसस्थानकावर गर्दीचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या अशा चोरीच्या घटनांवर आरसासारखी कारवाई होईल असा पोलीस विभागाचा विश्वास आहे.
या घटनेने प्रवाशांमध्ये सतर्कता वाढवली असून पोलिसांकडूनही बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याची तयारी सुरू आहे.



