चिखली

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; गुन्हा दाखल

सकल हिंदू समाजाची पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे कठोर कारवाईची मागणी

चिखली (Buldhana) : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकारामुळे हिंदू समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन तरुण आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी (२६ डिसेंबर २०२५) चिखली पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. तर सदर निवेदनानंतर फिर्यादी मंगेश वासुदेव इंगळे यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी प्रथम खबर अहवाल कलम १७३ (बिएनएसएस)नुसार तक्रार दाखल करून बिएनएस २०२३ चे कलम २९९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एका तरुणासह काही व्यक्तींनी सोशल मीडियाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीची आक्षेपार्ह विधाने केली आहेत. यामुळे शिवभक्त आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात असंतोषाची लाट उसळली आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, तसेच सखोल चौकशी करून या कृत्यामागील मास्टरमाइंड आणि प्रेरणा कोणाची आहे याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कठोर कलमांन्वये कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे. निवेदन देण्याच्या वेळी असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

अल्पवयीन आरोपी असल्याने त्याचे नाव जाहीर करण्यात येत नाही. तर चिखली पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button